Wednesday, June 6, 2012

अधुरी प्रेम कहाणी....

पावसाळी दिवसातील ती दुपार होती, साधारण २-३ वाजले असतील पण सूर्याचा कुठेच ठाव-ठिकाणा नव्हता.  आकाश काळ्या ढगांनी भरले होते, पावसाची बारीक-बारीक रिपरिप चालूच होती., सगळी धरती हिरवी-गार झाली होती, नारळाची झाडे मुक्त होऊन वाहणाऱ्या वाऱ्या बरोबर डोलत होती. घरात बसूनही कंटाळाच आला होता, मग कपडे चढवले, पायात चप्पल अडकवली आणि सरळ बाहेर पडलो.  रत्नागिरीत तशी मनोरंजनाची ठिकाणे फार नाहीत. मग जायला कुठली वाट नसली की मी सरळ समुद्र किनाऱ्याची वाट धरतो.  समुद्राची रूप पण किती वेगवेगळी असतात, सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात अवखळ भासणारा हाच समुद्र, दुपारी मात्र अंतःकरणात फार मोठे गुपित साठवून वागणाऱ्या गंभीर माणसासारखा भासतो. ओहोटीला, रुसून बसलेल्या मुलासारखा आपल्यापासून दूर जाऊन बसतो, तर भरतीला शत्रू सैन्यावर धावून जाणाऱ्या, विजयश्रीसाठी आसुसलेल्या सैन्यासारखा.
पावसात भिजत, समुद्राच्या हळुवार लाटा पायावर घेत किनाऱ्यावरून फिरण्यात जे सुख आहे ते काय वर्णावे. पण आज मला कशातच आनंद वाटत नव्हता. त्या विशाल समुद्रासमोर माझे एकटेपण मला जास्तच बोचत होते.  ज्या हातात कुणाचा हात नाही, त्या हाताचा उपयोग तरी काय? आपली कुणीतरी असावी, जवळची. मनातले सगळे विचार तिच्यासमोर मोकळे करून टाकावेत, आपण बोलत राहावे आणि तिने ऐकत राहावे, आणि तिने बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावे. तिच्या डोळ्यात बघत..सारी दुनिया विसरून जावे असे आणि बरेचसे विचार मनात गर्दी करून होते.  माझी तंद्री भग्न पावली ति कोणाच्या तरी आवाजानेच. कोणीतरी मला हाक मारत होते. मागे वळून पाहिले तर नेहा पळत येताना दिसली.
नेहा, माझ्या वर्गातली एक गोड चेहऱ्याची, गोड आवाजाची, मुलगी. .कोणालाही आवडावी अशीच. माझी आणि तिची फारशी ओळख नव्हती. काही दिवसांपूर्वीच तिचे वर्गातीलच विनीत या मुलाशी जमले.  खरं तर या बातमीने सगळ्यांनाच तसा धक्का बसला. विनीत दिसायला नीट-निटका, श्रीमंतीचा वारसा लाभल्याने नवीन नवीन गाड्या, सिनेमे, पार्ट्या यामध्येच रमणारा, त्याचे मित्रही थोडेसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे. कॉलेजमध्ये अधून-मधून घडणाऱ्या हाणामारीच्या प्रकरणात आघाडीची भूमिका बजावणारे. माझी आणि विनीतची तशी सुरुवातीला चांगली ओळख होती, पण नंतर नंतर मीच त्याच्यापासून जरा दूर झालो. नेहा अजूनही पळत येत होती. वाऱ्याने तिचे लांबसडक केस पार विस्कटून टाकले होते. कपाळावर टिकली, एका हातात नाजुकसे ब्रेसलेट आणि दुसऱ्यात दररोज वेगवेगळ्या असणाऱ्या बांगड्या, आणि पांढरा शुभ्र पंजाबी. समुद्राच्या त्या पार्श्वभूमीवर मला ती एखाद्या जलपरीसारखी भासत होती. पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावरून ओघळत होते.
“ओळखलंस मला?”, नेहा
“व्वा, तुम्हाला कोण नाही ओळखत, खरंतरं माझे नाव तुम्हाला माहीत आहे हे ऐकूनच आश्चर्य वाटले”, मी
“ए s s s तुम्ही वगैरे काय?”, नेहा
“मग काय, मोठी लोकं तुम्ही”, मी स्तुतिसुमन उधळायची काय थांबत नव्हतो. खरं तर ती माझ्याशी बोलतीय यावरच माझा विश्वास बसत नव्हता.
“पुरे पुरे.. तूच ठीक आहे.. बरं, तू एकडे कसा?” नेहा
“आलो असाच फिरत फिरत, मला समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला खूप आवडते.” मी
“हो sss  मला पण.. मी तुझ्याबरोबर इथे जरा वेळ फिरले तर चालेल ना?”, नेहा
त्यानंतर जवळ-जवळ एक तास भर आम्ही मस्त मनसोक्त गप्पा मारल्या. अगदी खूप वर्षापासून ओळख असल्यासारखी.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला जरा खुशीतच गेलो. नेहाशी गप्पा मारून मित्रांवर इंप्रेशन मारता येईल हाच विचार मनात होता. पण आज नेहा वर्गात आलीच नाही, त्यामुळे सगळे तास खूप कंटाळवाणे गेले. बाहेर पडलो. कॅटीनबाहेर नेहाची गाडी दिसली, म्हणून आत डोकावून पाहिले. नेहा-विनीत आणि त्याचा ग्रुप बसला होता. विनीत तिला जोर-जोरात काहीतरी ओरडत होता. शेवटी वैतागून ती बाहेर पडली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. नक्कीच काहीतरी भांडण झाली होती. मी बाहेरच उभा होतो. तिने एकदा माझ्याकडे बघितले आणि गाडी चालू करून निघून गेली.
मी पण माझी गाडी काढली आणि घरी न जाता, गाडी समुद्राकडे वळवली.  माझा अंदाज खरा ठरला. दूरवर नेहा गुडघ्यात डोकं खुपसून रडताना दिसली.  मला बघताच तिने डोळे पुसले, आणि दुसरीकडे कुठेतरी बघत बसली. बराच वेळ शांततेत गेला, मग तिच म्हणाली, “विनीत खरंच खूप चांगला आहे रे. त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तो माझ्या बाबतीत खूप पझेसीव्ह आहे. मी दुसऱ्या कुणाशी बोललेले त्याला आवडत नाही.. काल आपण इकडे गप्पा मारल्या ते त्याला कुणीतरी सांगितले, ते त्याला आवडले नाही. प्लीज तू त्याला समजावून सांग ना की आपल्यात तसे काही नाहीये.”
एवढे बोलून ति निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी विनीत आणि नेहाला एकत्रच भेटलो. त्याला खात्री पटवून दिली की तो समजतोय तसे काही नाहीये. त्यालाही ते पटले. मग भरपूर गप्पा मारून, ती दोघ निघून गेली.
त्यानंतर त्या दोघांमधील भांडण वाढतच गेली. कारण एकच, त्याचा पझेसिव्हनेस, कधी तिने केस मोकळे सोडले म्हणून, कधी लिपस्टिक लावले, कधी शॉर्ट स्कर्ट घातला, तरी कधी अजून काही. रोजची भांडण, रोजची रडारड. कधी ती मला भेटून त्याला समजवायला सांगायची, तर कधी तो मला भेटून तिला त्याच्यासाठी मनवायला सांगायचा. एव्हाना मी या वकिलीमध्ये चांगलाच पारंगत झालो होतो.  नेहा मला म्हणाली सुद्धा, तू वकील का नाही होत, चांगले बोलता येते तुला.
कित्येक दिवस गेले, भांडण मात्र या ना त्या कारणाने चालूच होती. विनीतचा माझ्यावर थोडाफार विश्वास होता, त्यामुळे तो त्याच्या मित्र-मंडळींसोबत कुठे चालला असेल तर मला नेहा बरोबर थांबायला सांगायचा. मग तो परत येईपर्यंत मी तिच्याबरोबर गप्पा मारत बसायचो. तिचे सरदारजीचे विनोद, कधीतरी एखादी कविता, तिचे गाणे गुणगुणणे, तिच्या मैत्रिणींचे प्रॉब्लेम्स, गॉसिप्स सगळे काही मनापासून ऐकायचो.  पहिल्या-पहिल्यांदा विनीतच्या परतण्याची वाट पाहणारी नेहा, नंतर नंतर मात्र त्याच्यापासून दूर जाऊ लागली, त्याला या ना त्या कारणाने टाळू लागली. त्या दोघांमधली दरी वाढतच गेली, आणि आमच्यातले अंतर कमी कमी होत गेले.
एके दिवशी तर कमालच झाली, गावात देवीची जत्रा होती, विनीत तिला त्याच्याबरोबर यायला सांगत होता, पण बरं नाही म्हणून टाळले. इकडे, मी आणि माझे काही मित्र-मैत्रिणी जत्रेला जाणार होतो, तेंव्हा नेहाने चक्क माझ्याबरोबर यायला संमती दाखवली. हे म्हणजे माझ्यासाठी खूपच होते. मी चक्क तिला माझ्या गाडीवर बसवून जत्रेला गेलो. तिकडे आम्ही खूप मजा केली.  जत्रेत रंगांची, गुलालाची खूप उधळण झाली. मग आम्ही सगळे अंगाला, कपड्यांना लागलेला रंग धुण्यासाठी समुद्रावर गेलो. तिकडे मस्त पाण्यात खेळलो, मातीत किल्ले केले, खूप धमाल केली. माझ्यासाठी तो दिवस स्वप्नवतच होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी सहजच तिला फोन केला, बोलताना सहजच विचारले, “कालचा रंग गेला का?”.
तर म्हणाली, “तो रंग केंव्हाच गेला, पण तुझा रंग उतरतच नाहीये.
 मी म्हणले, “म्हणजे काय?”
तर पटकन सारवासारव करून म्हणाली, “अरे म्हणजे तो कुठलातरी रंग तू लावलास ना, तो जातच नाहीये.”
त्यानंतर असे बऱ्याचदा होत गेले, ती मला काही सुचवायला तर बघत नव्हती?, असे तर नव्हते की ती आता माझ्यावर प्रेम करू लागली होती? नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर गोड शहारे उमटले. तिच्या मैत्रिणींचा पण माझ्याशी बोलण्याचा सुर बदलला होता. नेहा कुठे दिसली नाही, की त्या मलाच येऊन विचारायच्या, आणि मग उगाचच हसत निघून जायच्या. विनीत पण मला जाता येता टॉन्ट मारायचा, “गद्दार, बेवफा, दोस्त दोस्त ना रहा” वगैरे म्हणायचा.
दिवसांवर दिवस जात होते. माझी आता खात्रीच झाली होती की नेहाच्या मनात विनीत नसून मीच आहे.
पण एक दिवस माशी शिंकली, जे होऊ नये ते घडले. नेहा आणि विनीतला मी नारळाच्या बागेत हातात हात घेऊन गप्पा मारत बसलेले बघितले. माझ्या मनात रचलेले मनोरे, क्षणात कोसळून गेले. पुढे-पुढे तर काही झालेच नव्हते असे संबंध विनीत नेहा चे जमले. एकत्र फिरणे, सिनेमा वगैरे. आमच्या कॉलेजचे लव्ह-बर्डस…
आज बऱ्या दिवसांनी, पावसाचे परत भरून आले होते. आज परत मी एकटाच होतो. चालता-चालता सहज मागे वळून पाहिले, सगळा समुद्र-किनारा रिकामाच होता. कुणीतरी मागून पळत येऊन मला हाक मारेल ही अपेक्षा व्यर्थ होती. ओल्या मातीमध्ये पावलांच्या खुणा उमटत होत्या, आणि येणारी समुद्राची प्रत्येक लाट, आळीपाळीने एक एक खुणा मिटवत होत्या, जणु काही तो समुद्रच मला मागच्या खुणा विसरून जायला सांगत होता.
दूरवर MTDC मध्ये कुठल्याश्या रिमिक्स गाण्यावर तरूण-तरूणी नाचत होते, त्यातील काही ओळी कानावर पडल्या:
” जिंदगी मे कोई कभी आए ना रब्बा..
       आए तो कोई फीर जाए ना रब्बा ssss
   देने हो अगर मुझे बाद मै आसू..
      पहेले कोई हसाए  ना रब्बा  s s s..  पहेले कोई हसाए  ना  रब्बा  “
Aniket.......

2 comments: