Sunday, June 17, 2012

विठ्ठलाचा प्रपंच...!!



विठ्ठलाचा प्रपंच
आपल्याकडली इतिहास संशोधक मंडळी मुख्यत: स्थितीवादी, परंपरावादी आणि अप्रत्यक्षरीत्या सनातनी दृष्टीची आहेत. ही मंडळी श्रुती-स्मृती-पुराण यातून जन्म पावलेले वैष्णवी संप्रदाय आणि या वैष्णवी संप्रदायात मोडणार्‍या वारकरी पंथाविषयी नि:पक्षपाती लिहिताना दिसत नाहीत. अद्वैत वेदांताचे आणि चैतन्यवादाचे वैचारिक अधिष्ठान असतानाही वारकरी संप्रदाय स्वाभाविकपणे जनसामान्यांच्या मनाची पकड कसा घेऊ शकला? तत्त्वज्ञानाच्या गहन चर्चेत अडकून पडला असता तर हा संप्रदाय अभिजन वर्गापुरताच मर्यादित असता. दलित-शोषित कष्टकरी - शेतकरी-शेतमजूर भूमिहीन आदी वर्गाचा जीवनाधार वारकरी संप्रदाय होऊ शकला असता का? धर्माच्या अवडंबरातून सर्वसामान्य माणसाला सहजपणे बाजूला काढून त्याला एकेश्‍वरी जाणिवेपर्यंत आणि मानवधर्मापर्यंत कसा घेऊन आला हे पाहण्यासारखे आहे. वारकरी संप्रदायाच्या स्थापनेचे श्रेय पुंडलिकाला द्यायचे की माऊलीला म्हणजे ज्ञानेश्‍वररायाला याचे निर्भीड विवेचन आजवर तरी कुणी केल्याचे दिसत नाही. ज्यांनी ते केले ते एकतर्फी आहे. जे कुणी करतात, एकतर ते तथाकथित बुद्धिवाद्यांमध्ये मोडतात अथवा विज्ञान संस्कृतीचे,त्यातून प्रसवलेल्या धर्मनिरपेक्षतेचे पाठीराखे असतात. त्यांचा वारकरी संप्रदायाला उचलून धरणार्‍या कष्टकरी वर्गाशी काडीचाही संबंध नसतो. अशाच एका विद्वानाचे निर्जीव विवेचन खाली देत आहे. उदाहरणासाठी ते गैर ठरू नये.
‘‘वैष्णवांच्या भागवत संप्रदायात आधिदैविकदृष्ट्या वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध हा चतुर्व्यूह व तत्त्वज्ञानामधील द्वैतवाद यांना महत्त्व आहे, पण महाराष्ट्रातल्या या वैष्णव संप्रदायात ‘चतुर्व्यूह सिद्धांत’ मानलेला नसून तत्त्वज्ञानातील अद्वैत मताचा पुरस्कार केलेला आहे. पांडुरंगस्वरूपी किंवा विठ्ठलस्वरूपी भगवान श्रीकृष्ण हे या संप्रदायाचे मुख्य उपास्य दैवत असल्याने विष्णूचा पूर्णावतार म्हणून श्रीकृष्णाचे चरित्र वर्णन करणारे श्रीमद्भागवत हा या संप्रदायाचा परम आदरणीय ग्रंथ आहे. तसेच गीता ही साक्षात श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भक्ताला सांगितलेली असल्याने व वारकरी संप्रदायाचे महान प्रवर्तक श्रीज्ञानेश्‍वर महाराज यांनी गीतेवर अद्वितीय टीका ग्रंथ (भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्‍वरी) लिहिला असल्याने गीता ग्रंथ या संप्रदायात शिरोधार्य आहे. भागवताच्या एकादश स्कंधावरील एकनाथ महाराजांचे रसाळ भाष्य (एकनाथी भागवत) हा ग्रंथही या संप्रदायात ज्ञानेश्‍वरीइतकाच प्रमाणभूत आहे.’’
१४व्या शतकापर्यंत वारकरी संप्रदाय बराच दृढमूल झाला. पंढरपूरचा महिमा सर्वत्र गाजू लागला. अशा परिस्थितीत विजयनगरच्या रामराजाने वारकर्‍यांचे परम दैवत पंढरपुरातून अनागोंदी येथे नेऊन प्रस्थापित केले. आषाढीच्या यात्रेसाठी जमलेल्या भक्तजनांत या प्रकाराने मोठा हाहाकार झाला. तेव्हा संत भानुदास यांनी अनागोंदीस जाऊन व आपल्या भक्तिबळाने राजास प्रभावित करून कार्तिकी पौर्णिमेस पांडुरंगाला वाजत गाजत पंढरीला आणले. तेव्हापासून कार्तिकी एकादशीच्या यात्रेला विशेष महत्त्व आले. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात ही घटना विशेष महत्त्वाची आहे. वारकरी या संप्रदायानुसार ‘वारकरी’ शब्दाचा हा अर्थ घेतला जातो की, वर्षातून आषाढी कार्तिकी एकादशीला जे पंढरपूरची वारी दिंडीसह करतात ते वारकरी. कृष्णभक्तीची तीव्र आस मनाला लागलेली. श्रीकृष्णाला प्रिय असणार्‍या तुळशीची माळा संप्रदायाची दीक्षा घेण्यार्‍यांसाठी आवश्यक. ही माळा धारण केल्यामुळे या भक्ताला माळकरी म्हणूनही संबोधले जाते. या संप्रदायाचे संस्थापकपद ज्ञानेश्‍वरांना दिले जाते ते त्यांनी या संप्रदायाचे केलेले प्रवक्तेपण म्हणून. मग प्रश्‍न उद्भवतो पुंडलिकाच्या संदर्भाचा. हा पंथ सार्वत्रिक करणार्‍या नामदेवाचा. या दोघाही महासंतांना या संप्रदायाच्या स्थापनेचे श्रेय द्यायचे काय? आयडॅलिझम, चैतन्यवाद, अद्वैत वेदांत हे तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठान ज्ञानोबाने स्वीकारलेल्या प्रस्थापितांच्या बांधिलकीचे तेच या संप्रदायाचे अधिष्ठान ठरले. ज्ञानोबांचे गुरू त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ नाथपंथी. या नाथपंथाच्या संकल्पना न स्वीकारता चक्क आद्य शंकराचार्यांनी सांगितलेल्या अद्वैताकडे माऊली वळतात कसे? वारकरी संप्रदायातला तत्त्वज्ञानात्मक संघर्ष या वारकरी संप्रदायाला ज्या बहुजन समाजाने स्वीकारले त्यामुळे हा संघर्ष मागे पडून पुढे या संप्रदायाला रूप आले ते मानवधर्माचे. नाथपंथ शैववादी हिंदुस्थानी तत्त्वज्ञानातील शंकरपार्वती ही एक सर्वश्रेष्ठ मीथ आहे. शंकराने पार्वतीला गूढ अध्यात्माचा उपदेश केला. त्याचा उद्गार म्हणजे शैवपंथ - माऊलींनी एकदम त्याचे उत्तरदायित्व नाकारून वैष्णवाची पतका खांद्यावर घ्यावी हे आश्‍चर्य वाटते. ज्ञानेश्‍वरांच्या समकालीन संतांमध्ये मुख्य आहेत नामदेव. ज्ञानोबांच्या समाधिस्थ होण्यानंतर त्यांचे एकेक भावंड समाधिस्थ होऊन इहलोकीची यात्रा संपवत गेले. संप्रदाय वाढविला नामदेवांनी. नंतर तीनशे-चारशे वर्षांनी एकनाथ - तुकारामांनी. रामदासांना वारकरी संप्रदायात सामावता येणार नाही. त्यांचा तात्त्विक बाज अजून वेगळा आहे. अगदी अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीपासून मोगलशाह्या, आदिलशाह्या, निजामशाह्यांच्या राजवटीतल्या बंधनांना जुगारून हा वारकरी संप्रदाय ऋषिकेशवरून हिमाचलातून जन्म पावलेल्या गंगेसारखा पुढे पुढे चालत राहिला. त्याचा नद आणि नदानंतर महासागर होत राहिला. त्याचं कारण शोषित, कष्टकरी समाजाने वारकरी संप्रदायाचा केलेला स्वीकार आणि स्वत:च्या खांद्यावरून या संप्रदायाची वाहिलेली पालखी हे होय. येथे कर्नाटकातून काळ्याकभिन्न बलदंड ठेंगू प्रकृतीच्या आलेल्या विठ्ठलाच्या कथेचा संदर्भ देण्याचे मुद्दाम मी टाळले आहे.
बहुजन समाजाचं पंढरीशी आंतरिक नातं आहे. पंढरीतील पांडुरंग विठ्ठल : विठोबा : विठाई महाराष्ट्रासोबत आंध्र, कर्नाटकातल्याही बहुजन समाजाचे द्रष्टे दैवत. ‘विठ्ठल’ सावळे सुंदर ध्यान. वारकरी संप्रदायाचे आद्य अधिष्ठान, मानवतावादाचा, आध्यात्मिक समतेचा ध्वज याच विठोबाला केंद्रस्थानी ठेवून, वारकरी संप्रदायाने कष्टकर्‍यांच्या, शेतकर्‍यांच्या घामाने नि रक्ताने भिजलेल्या पवित्र मातीत रोवला. आठशे वर्षे उलटून गेली या घटनेला. ज्या काळी धर्मवेत्त्यांनी, धर्मशास्त्रांनी प्रस्थापित केलेल्या चतुर्वर्ण्य पद्धतीत केसभरही बदल शक्य नव्हता, तिथे हे सर्व घडले. स्वकीय असोत अथवा परकीय राज्यकर्ते (मुस्लिम), त्यांनीसुद्धा जाती प्रथा नि रूढी संकेतांना निरंकुश मान्यता दिली होती. हिंदू समाजाने जाती प्रथेवर आधारलेली कर्मठ-कठोर श्रेणी व्यवस्था मान्य करून धर्माधिष्ठित न्यायनिवाडाही आपल्या राज्यात लागू केल्याचा इतिहास आहे. धर्मशास्त्राने घालून दिलेल्या मर्यादा उल्लंघणे सर्वसामान्यांसाठी दैववशातच नव्हे, तर निजी जीवनातही दुरापास्त होते. ज्ञानार्जनाचा सर्वस्वी अधिकार ब्राह्मण जातीपुरता मर्यादित होता. परकीयांचे जोखड सन्मानाने मानेवर घेऊन मिरवणारी हीच जात शूद्रातिशूद्रांना धर्मशास्त्राचा आधार घेऊन ब्रह्म, ईश्‍वर, मोक्ष, मुक्ती कर्मकांडाच्या नावाखाली भरडून काढत होती. या सर्वांविरुद्धचे म्हटले तर प्रतीकात्मक, म्हटले तर साक्षात बंड म्हणजे वारकरी संप्रदाय होता. या संप्रदायाचे प्रवक्तेपण तसे ज्ञानेश्‍वरांकडे जात असले तरी खर्‍या अर्थाने ही चळवळ बहुजन समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम संत नामदेव, संत तुकाराम यांनीच केले. वारकरी संप्रदायाच्या प्रवक्तेपणाची नि भाष्यकाराचीसुद्धा पदवी द्यायची झाली तर ती अग्रक्रमाने या संतद्वयींनाच द्यावी लागेल. त्यातही नामदेवांचा नंबर दोघांतही वरचा ठरला तर गैर समजू नये. वेदोपनिषदांतील ज्ञान संस्कृत भाषेचा अडसर दूर करून ज्ञानेश्‍वरांनी प्राकृतात आणून त्याचे नाते वारकरी संप्रदायाशी जोडण्याचा प्रयत्न केला. आडवळणाने त्यात हे जे काही घुसले, ते जाणीवपूर्वक घुसवले गेले. त्यामागे कळीचे सूत्रधारही आहेत. वारकरी संप्रदायाने एकमुखी मान्यतेने हा प्रयत्न स्वीकारला नाही. बोटांवर मोजण्याइतक्या संतांपुरताच तो तत्त्वज्ञानाचा, धर्मशास्त्राचा भाग म्हणून राहिला. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले । तर्‍ही आपण हित आपुले। तेचि घेणे। तैसे ज्ञानिये जे होती। ते वेदार्थति विचारिती - असे ज्ञानेश्‍वरांनी सांगितल्यानंतरही नामदेवांच्या विठ्ठलाने या वेदोपनिषदांना लंघून, उच्च-हीन कुळाचे अंतर तोडून माणसामाणसात सेतू बांधला. वेदासी कानडा ऋतीसी कानडा। विठ्ठल उघडा। पंढरीये-ज्ञानेश्‍वरांनी स्वीकारलेल्या चिद्वादाला नामदेवांनी म्हटले तर पहिल्या फटक्यात नाकारले आहे. जादूटोणा, जारणमारण, अंधश्रद्धा, होमहवन, कर्मकांड, बुवाबाजी, मूठ मारणे, मिरची मोहरी, कावळा, घुबड, शकुनापशकुन या सर्वांना ओलांडून वारकरी संप्रदाय पुढे गेला. गतानुगतिक झालेल्या समाज जीवनाला सुखकर नि:श्‍वास विठ्ठलाच्या माध्यमाने त्यांनी सर्वसामान्य माणसाला देण्याचा प्रयत्न केला. यामागे स्पष्ट वैचारिक भूमिकाच होती. जिच्यामुळे काही सामाजिक सुधारणांचे कामही जाहले. भक्त विठोबाचे भोळे । त्यांचे पायी ज्ञान लोळे । भक्तिविण शब्दज्ञान।व्यर्थ अवघे ते जाण। ब्रह्मज्ञानविण मोक्ष आहे भूती। वाचेसि म्हणती विठ्ठलनामा वेदप्रामाण्यांची साधकबाधक चर्चा आपापल्या बौद्धिक आणि सदसद्विवेकी मगदुराप्रमाणे संतांनीही केली आहे. चोखोबांच्या बंडखोर मुलाने या सर्वांवरच कडवी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो विद्रोहाचा अवतारच होता. त्याने विठ्ठलालाही वेठीस धरले.

- नामदेव ढसाळ

No comments:

Post a Comment