Thursday, May 31, 2012

स्वाभिमान आणि समाधान..!





शेतीविषयक कामासाठी आलेले ते वृद्ध गृहस्थ परिस्थितीने गरीब दिसत होते. त्यांना हवे असलेले दोन अर्ज मी लिहून दिल्याबद्दल त्यांनी मला "फी' देऊ केली, पण मी ती नाकारली. मात्र तरीही आजोबांनी अर्जांवर लावलेल्या तिकिटांचे पैसे दिलेच. स्वाभिमान कसा असतो, ते मला दिसले...

वकिली व्यवसायात असल्यामुळे पुणे शहरातील जवळ जवळ सर्वच न्यायालयांत जाणे होते. यादरम्यान सर्व प्रकारचे, विविध स्वभावांचे लोक सतत भेटत असतात. काही विक्षिप्त, काही रागीट, काही शांत, तर काही स्वाभिमानी स्वभावाचे. अशा एका स्वाभिमानी माणसाबद्दलचा हा एक अनुभव.

काही दिवसांपूर्वी माझ्या एका वकील मित्राबरोबर कॅम्पमधील कमिशनर ऑफिसमध्ये (काउन्सिल हॉल) एका कामानिमित्त जाण्याचा योग आला. येथे शेतीशी निगडित वाद, भांडणे यांच्याविषयीच्या केसेस कमिशनरसाहेबांसमोर चालतात. साधारणतः दुपारी साडेतीनच्या सुमारास आम्ही तेथे पोचलो. माझे काही काम नसल्यामुळे मी साहेबांच्या केबिनच्या बाहेरच थांबलो. तेवढ्यात साहेबांच्या केबिनमधून एक 80 ते 85 वर्षांचे गृहस्थ बाहेर आले. त्यांनी मळलेला नेहरू सदरा, धोतर आणि डोक्‍यावर गांधी टोपी, असा वेश परिधान केलेला होता. वयोमानामुळे खूप थकलेले असल्यामुळे, त्यांच्याकडे आधारासाठी वापरून वापरून गुळगुळीत झालेली एक काठी होती. एकंदरीत ती वृद्ध व्यक्ती एखाद्या खेडेगावातून आलेली दिसत होती. हातातील काठी टेकवत टेकवत ते गृहस्थ माझ्याजवळील खुर्चीत येऊन बसले. माझ्या अंगावरील कोट त्यांनी पाहिला आणि ते मला म्हणाले, ""वकीलसाहेब, तुम्हाला मी फी देतो; पण मला दोन अर्ज लिहून देता का?'' ते वृद्ध गृहस्थ गरीब व खेडेगावातून आले असे वाटत असल्यामुळे मी त्यांचे अर्ज लिहून देण्यास तयार झालो व मला याबद्दल तुमच्याकडून फी नको, असेही त्यांना सांगितले आणि अर्ज लिहिण्यास सुरवात केली. इथे त्यांच्या शेतीविषयीची केस बऱ्याच वर्षांपासून चालली आहे व ती केस लवकरात लवकर संपवावी, अशा आशयाचे ते अर्ज होते. अर्ज लिहिता लिहिता त्यांच्याबद्दल मी विचारपूस केली असता मला कळाले की, ते गृहस्थ सोलापूर जिल्ह्यातील एका दूरच्या खेडेगावातून आले होते. वयोमानामुळे खूप थकलेले आणि त्यामुळे काठीचा आधार घेऊन चालावे लागणारे हे गृहस्थ आपल्या शेतीचा निकाल लवकर म्हणजे माझ्या हयातीत लागावा'' यासाठी इतक्‍या लांबून आले होते!

ते अर्ज लिहून झाल्यानंतर त्या दोन्ही अर्जांना मी माझ्याकडील पाच पाच रुपयांची तिकिटे लावून दिली व ते त्यांना साहेबांकडे देण्यास सांगितले. तेवढ्यात ते त्यांच्या नेहरू शर्टमधून प्लॅस्टिकच्या एका जुन्या पिशवीतून एक पन्नास रुपयांची नोट काढून माझी फी म्हणून द्यावयास लागले. पण ती घेण्यास मी नकार दिला. परंतु ते वृद्ध गृहस्थ, काही केल्या माझे ऐकत नव्हते. शेवटी त्यांना खूप समजावून सांगितले, की अहो आजोबा, दोन ओळींचा अर्ज लिहिण्याकरिता मला फीची गरज नाही. मग त्यांनी शेवटी दहा रुपयांची एक नोट मी लावलेल्या तिकिटांसाठी देऊ केली. यावरून माझ्या लक्षात आले, की ही व्यक्ती गरीब आहे; पण स्वाभिमानीसुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोचू नये म्हणून मी ती दहा रुपयांची नोट स्वीकारली. या सगळ्यातून मला एका गरीब, खेडूताचे; परंतु प्रचंड इच्छाशक्ती आणि स्वाभिमानाचे दर्शन घडले. जाताना त्यांना सावकाश जा, असे सांगून मी निघालो. मदत केल्याबद्दल त्या आजोबांनी हात जोडून मला धन्यवाद दिले.

मला माहीत होते, की मी केलेली मदत किरकोळ प्रकारची होती; पण काहीतरी मदत केली, याचे मला समाधान मिळाले. त्याचबरोबर कितीही गरिबी असली तरी स्वाभिमान जपणाऱ्या या आजोबांकडून स्वाभिमान काय असतो, हे शिकायला मिळाले. त्यामुळे त्या दिवशी स्वाभिमान आणि समाधान या दोन गोष्टी एकत्र अनुभवायला मिळाल्या

No comments:

Post a Comment