Thursday, May 31, 2012

स्वीकृत सत्ये!

 धावत्या जगात आपलं आयुष्यही किती बदललं आहे! एकेकाळी मोबाईल फक्त श्रीमंतांसाठी असणार असं वाटत असताना मोबाईल सर्वव्यापी झालाय. पूर्वी "महिनाअखेर' हा शब्द ऐकू यायचा, आता जणू तो हद्दपार झालाय. गरज आहे जुनं टिकवून नवं स्वीकारण्याची...
eality Face करणं "Fact accept' करणं हे आता खूप अंगवळणी पडलंय नाही का आपल्या? रोज नवीन घटना ऐकायला मिळतात आणि "आपला काय संबंध' म्हणून चर्चा करून रीतसर विसरल्याही जातात.

आता पाहा या काही "फॅक्‍ट्‌स' ः एकेकाळी मोबाईल हा फक्त श्रीमंत लोकांकडेच असू शकतो, असे वाटत असतानाच सात-आठ वर्षांत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातातही तो दिसू लागला. वस्तू स्वस्त झाल्या का लोक श्रीमंत?

एकेकाळी बाबा आणि आजोबांच्या तोंडून "महिनाअखेर' हा शब्द दर महिन्याला ऐकू यायचा आणि त्यामुळे अडीच रुपयांचं आइस्क्रीमसुद्धा 23-24 तारखेनंतर मागणं आपोआपच बंद व्हायचं...! पण आता, मुलांचा "पॉकेटमनी'च एखाद्या गरीब माणसाच्या पगाराइतका झालाय. दहावी - अकरावीच्या मुलांच्या हातात अत्याधुनिक घड्याळे टिकटिकताना दिसतात. मला आठवतंय, माझ्या जॉबची पहिली दोन वर्षे मी सायकलवरून जायचे, पण आता 16 वर्षे पूर्ण झाली, की आई-वडील मुलांना परीक्षेत चांगले मार्क्‍स पडण्याच्या बदल्यात भारी स्कूटर किंवा मोटरसायकलची स्वप्ने दाखवतात. कॉफीच्या "कॉलेजिअन्स'ची गर्दी वाढली आणि महागडी कॉफी पिण्याइतकी तरुणाई श्रीमंत झाली. कदाचित पूर्वीची "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' ही म्हण हळूहळू लोप पावतेय.
एकीकडे जाणवतंय, समाज प्रगत होत चाललाय, भारत "डेव्हलप कंट्री' झालाय! वाडे नष्ट होऊन बिल्डिंग उभ्या राहिल्यायत. दर चौथ्या - पाचव्या इमारतीत कोणीतरी परदेशी चाललाय, एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबे झाली... मुलांना अंगण, माजघर, आजीच्या गोष्टी, विटी-दांडू, पाणी तापवण्याचा बंब, पिंप, कोब्याची फरशी, तुळई, सोवळं-ओवळं, तिन्हीसांज, शुभंकरोती या आणि अशा गोष्टींची आणि शब्दांची आठवणही नाही राहिली. कमी पैशांत "काटकसर' करून भागवण्यातला आनंदही हरवून गेलाय. पूर्वी दहा-पंधरा भावंडांच्या गोतावळ्यात दिवसाची सांज कधी व्हायची पत्ता लागत नसे आणि आता इन मीन दोन असूनही त्यांना एकमेकांना भेटायला वेळ होत नाही. तेव्हा दोन खोल्यांमध्ये सात-आठ जण राहात असत; पण आता चार खोल्यांमध्ये चार जणांना "प्रायव्हसी' लागते. पूर्वी कुठे होते "मदर्स डे', "फादर्स डे' आणि व्हॅलेंटाइन डे'? पण प्रेम तर तेव्हाही होतंच ना?

"इंग्लिश कल्चर'च्या नावाखाली मातृभाषेला विसरू लागलेत. माझा मुलगा/ मुलगी "मराठी मिडीयम'मध्ये जातो/ जाते, हे सांगायला आता आम्हाला लाज वाटते आणि त्याचं किंवा तिचं शिक्षण यापेक्षा आपला "स्टेटस सिम्बॉल' जास्त महत्त्वाचा झालाय. ही "फॅक्‍ट' आहे, कटू सत्य!

पण कोणीही काहीही म्हणो; तीच "फॅक्‍ट' कुठेतरी तुम्ही - आम्ही "ऍक्‍सेप्ट' केली आहे, नाही का? आणि आपलं आयुष्य दुःखी करून घेतलं आहे... आणि हेच कारण आहे, पूर्वी psychiatrists `family courts` नसण्याचं! जाणवतं मग - जुनं तेच सोनं!

करू यात का मग आपण सगळेच प्रयत्न, जुनं टिकवून नवीन स्वीकारण्याचा?

No comments:

Post a Comment