Monday, September 10, 2012

इव्हेंट की उत्सव...!!


सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप पाहता त्याला उत्सव म्हणावे की इव्हेंट असा प्रश्‍न पडतो! 
‘फ्रीज आणि फेसबुक यात काय साम्य आहे सांगा? त्यात काही नाही हे माहित असून सुध्दा लोक दिवसातून दहा वेळा ते उघडून पाहतात.’ मध्यंतरी कोणीतरी हे विधान फेसबुकवर केलं होतं. पण खरंय, लोक रोजच्या व्यवहारात स्वत:ला अप टू डेट ठेवत नसले तरी फेसबुकवर मात्र आपली वॉल अपडेट ठेवणं पसंत करतात. मग तो कोणताही सण, उत्सव असो. त्याची पहिली झलक फेसबुकवर बघायला मिळते. जसे की, गणेशोत्सवासाठी मूर्तीकारांनी मूर्ती बनवण्यास सुरूवातही केली नसेल तेव्हापासून फेसबुक वर गणपतीच्या फोटोसकट ‘मी येतोय-उरले फक्त ६० दिवस.’ असे चित्र झळकले होते. बाप्पाच्या येण्याची सगळेच जण आतुरतेने वाट बघतात. कारण, तो आहेच मुळी मंगलमूर्ती. परंतु, समाजात गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपामुळे भक्तीच्या जागी दिखाऊपणा येतो की काय अशी भिती वाटते. 
फेसबुकवर कोणी कृष्णजन्माष्टमीला कृष्णाचे, रामनवमीला रामाचे, गणेशोत्सवाला गणपतीचे, नवरात्रीला देवीचे फोटो आपल्या वॉलवर टाकले म्हणून काही बिघडत नाही. कारण, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. परंतु, जेव्हा कोणी फेसबुकवर, ईमेलवर देवांचे फोटो पाठवून पाच मिनिटांच्या आत ते शेअर करा, फॉरवर्ड करा, असे केल्याने तुम्हाला काही दिवसातच अलभ्य लाभ होईल असे सांगतात, तेव्हा ते अंधश्रध्देचे बीज जनमानसात नकळतपणे रूजवले जाते. दु:खाने ग्रासलेले, कमी कष्टात यशप्राप्ती व्हावी असा विचार करणारे, आहे त्यात सुख न मानणारे लोक अशा कृत्यांना दुजोरा देतात. मात्र त्यांच्या वागण्याचा त्रास दुसर्‍यांना होतो. कारण, अशा ईमेल मध्ये सर्वात शेवटी एक ओळ असते, ‘या ईमेल कडे दुर्लक्ष केल्यास देवाचा कोप होईल, वाईट बातमी कळेल, इ.’ हे वाचून भाबडे लोक आपल्यावर संकट येऊ नये म्हणून या कृत्यात सामील होतात. या प्रकरणाला उत्तर देताना एकाने फेसबुकवर लोकांना आवाहन केले होते, ‘मित्रांनो, अशा पोस्ट शेअर करू नका. तसे केल्यास ते अंधश्रध्देला खतपाणी ठरेल. देवतांच्या काळात फेसबुक नव्हते, त्यामुळे अशा पोस्ट शेअर न केल्याने तुमच्यावर कोणतेही संकट ओढवणार नाही याची खात्री बाळगा.’ 
स्वत:ला सुशिक्षित म्हणवणार्‍या माणसांना हे समजवण्याची वेळ का यावी? गणेशोत्सवात याची कित्येक उदाहरणे आपल्याला सापडतील. गणपती मुर्तीची उंची १८ फूटापेक्षा जास्त नसावी, उत्सवाच्या कालावधीत स्पीकरच्या आवाजाने स्थानिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, गणेशदर्शनाला येताना स्त्रीयांनी तोकडे कपडे घालू नये, मूर्ती विसर्जनाच्यावेळी चौपाटीवर निर्माल्य, कचरा टाकून प्रदुषण करू नये, हे सगळं सांगावं लागतं याचं कारण एकच, लोक सुशिक्षित झाले पण सुसंस्कृत नाही. 
भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी घरोघरी पुजला जाणारा हा गणपती बाप्पा लोकमान्य टिळकांनी समाजहितासाठी, समाजाला संघटित करण्यासाठी घराबाहेर आणला. त्याला सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले. त्यांचा मानस काही प्रमाणात पूर्ण झाला असे म्हणता येईल. कारण, गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोक राग-लोभ विसरून एकत्र येतात. परंतु, विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत एका गल्लीतल्या गणपतीची मिरवणुक, पुढच्या मिरवणुकीला मागे सारून पुढे जात असल्यास कार्यकर्त्यांमध्ये ‘राडे’ होतात. हे चित्र ना लोकमान्य टिळकांना अपेक्षित होतं ना बाप्पाला!
सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल बोलावं तेवढं थोडं पण घरगुती गणपतीही या शर्यतीत मागे नाहीत. घरात लहानग्यांच्या हट्टापायी काही कुटुंबात गणरायाचे पाचारण केले जाते आणि आपल्या सोयीप्रमाणे दीड दिवसानी, पाच दिवसानी, नऊ दिवसानी विसर्जन केले जाते. बाप्पा येणार म्हटल्यावर लोक आपल्या ऐपतीप्रमाणे घरात सजावट करतात. आनंदाने, वाजत-गाजत बाप्पाला घरी आणतात. मुर्ती बसवण्यासाठी भटाला (आजकाल गुरूजी कोणी म्हणत नाहीत) बोलवतात. ‘पुजा लवकर उरका’ असा सल्ला देतात. पुजेसाठी ब्राह्मण न मिळाल्यास कॅसेट, सीडी लावून मुर्ती मखरात बसवतात. मग नैवेद्याची लगबग. पाहुण्यांची सरबराई सुरू होते.
येणारे पाहुणेसुध्दा कमालीचे असतात. येतात बाप्पाच्या दर्शनाला पण मुर्ती सोडून बाकीच्या सजावटीचेच कौतुक करतात. दर्शन घेतानाही चार लोकांना दिसेल अशा पध्दतीने खिशातून ५०-१०० रूपयांची नोट काढून देवापाशी ठेवतात. यजमानांना मिठाईचे पुडे देतात. बाप्पासमोर डझनभर केळी ठेवतात. तीर्थ-प्रसाद घेऊन झाल्यावर चहा-सरबत-नाश्ता घेऊन मगच निघतात. 
बाप्पा येण्याच्या दिवशी लोक डीजेच्या तालावर नाचत बाप्पाला मंडपात घेऊन येतात त्यावेळी त्यांचा आनंद आपण समजू शकतो. परंतु, विसर्जनाच्या दिवशीसुध्दा शिला, मुन्नी, जलेबीबाई यांच्या तालावर, हलकट जवानी सारख्या गाण्यावर नाचत लोक बाप्पाला निरोप कसा काय देऊ शकतात? 
बाप्पा दहा दिवस पृथ्वीतलावर येतात. लोकांच्या गराड्यात आपला भक्त शोधतात. त्यावेळी त्यांना इकोफ्रेण्डली गणपती बनवणारे, उत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे, लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्या कलागुणांना वाव देणारे, विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी चौपाटीवर जाऊन मुर्त्यांचे अवशेष, निर्माल्य उचलून परिसर स्वच्छ करणारे कार्यकर्ते दिसले की ते खुष होतात. आणि त्या भक्तांच्या भेटीसाठी पुढल्या वर्षी पुन्हा येईन असा शब्द देतात. असे कार्यकर्ते केवळ उत्सवातच नाही तर कायमस्वरूपी समाजसेवेचे कार्य करतात. आणि बाकीचे मात्र अनंत चर्तुदशीच्या दिवशी `Bappa Went' असे फेसबुकवर स्टेटस अपडेट करीत `Event' संपवतात.
- ज्योत्स्ना गाडगीळ

No comments:

Post a Comment