सरकारने देश विकला तरी चालेल, मुडदा झालेल्या देशाच्या टाळूवरचे लोणी खायला मिळाले म्हणजे झाले याच समाधानात ‘यूपीए’ सरकारचे टेकूचंद पक्ष आहेत.
देश विकणारे सौदागर!
निदान यावेळी तरी ममता बॅनर्जी शब्दाला जागल्या आहेत व बोलल्याप्रमाणे वागल्या आहेत. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असे एक संतवचन आहे, पण ममता बॅनर्जी यांच्या पावलांवर पाऊल ठेवून केंद्र सरकारचा पाठिंबा आणखी कोणते घटक पक्ष काढणार? हाच खरा प्रश्न आहे. भयंकर डिझेल दरवाढ करून सरकारने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले व काही झाले तरी ही दरवाढ मागे घेणार नाही असे जाहीर केल्याने ममता बॅनर्जी संतापल्या. त्यात स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीत कपात केली आणि किराणा-भुसार दुकानदारीत परदेशी गुंतवणुकीस परवानगी देऊन केंद्राने पाच कोटी लोकांच्या रोजगारावर गदा आणली. हे सर्व जनताद्रोही निर्णय घेतले जात असताना ‘यूपीए’ सरकारातील सत्तालंपट घटक पक्ष काय करीत होते? केंद्र सरकारात सामील झालेले ‘टेकूचंद’ पक्षही कॉंग्रेसएवढेच पापी आहेत. या पापात आपण सहभागी नसल्याचे ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसने दाखवून दिले. केंद्रातील सरकारातून बाहेर पडण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी जाहीर केला. सरकारने देश विकायला काढला असल्याची टीका त्यांनी केली. ममता यांचा पक्ष कालपर्यंत सत्तेत सहभागी होता. त्यामुळे कॉंग्रेसने देश विकायला काढला या आरोपावर लोकांनी विश्वास ठेवायला हवा. ममता बॅनर्जी यांनी जो हल्ला केला त्यामुळे कॉंग्रेसची दोन्ही थोबाडे रंगली आहेत व त्या सुजलेल्या थोबाडांवर ‘बाम’ चोळण्याची जबाबदारी मुलायमसिंग व मायावती पक्षांवर येऊन पडली आहे. तृणमूलने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार काठावरच्या बहुमतावर उभे आहे. बहुमतासाठी २७२ चा आकडा हवा. ममतांनी पाठिंबा काढल्याने आकडा २५४ वर घसरला. त्यामुळे मुलायम पक्षाचे २२ व मायावती पक्षाचे २१ खासदार मनमोहन यांच्या जनताद्रोही सरकारला पाठिंबा देणार असतील तर देश विकण्याच्या सौद्यात ते सहभागी होतील. ‘ममता’ यांच्या पाठोपाठ द्रमुक व राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाहेर पडायला हवे होते, पण कॉंग्रेसप्रणीत सरकारने देश विकला तरी चालेल, मुडदा झालेल्या देशाच्या टाळूवरचे लोणी खायला मिळाले म्हणजे झाले याच समाधानात ‘यूपीए’ सरकारचे टेकूचंद पक्ष आहेत. कॉंग्रेसच्या मस्तवालपणास व अरेरावीस कंटाळून ममता बॅनर्जी यांनी सरकारला सोडचिठ्ठी दिली, पण ममतांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या तर त्या पुन्हा मनमोहन-सोनियांच्या गोठ्यात शिरू शकतात. म्हणजे ब्लॅकमेलिंग दोन्ही बाजूंनी चालले आहे. संसदेला व सरकारातील मित्रपक्षांना विश्वासात न घेता ‘यूपीए’ सरकार निर्णय घेत असल्याचा भडका ममता बॅनर्जींनी उडवला आहे. याच प्रकारचा भडका दोन महिन्यांपूर्वी केंद्रात शरद पवारांनी उडविला होता व त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकून ‘बंडोबा’ची डरकाळी मारली होती. या बंडोबांनीही नंतर नेहमीप्रमाणे सत्तेला चिकटून राहण्याचे धोरण स्वीकारले. तुमचे बंड व डरकाळ्या या देशासाठी किंवा जनतेसाठी नसून स्वत:च्या राजकीय मतलबांसाठीच आहेत हेच यातून दिसते. मुलायमसिंग एका बाजूला कॉंग्रेसला देशाचा शत्रू मानतात, कॉंग्रेसशी आपले जमणार नाही असे बोलतात, पण सोनियांचे सरकार डळमळू लागले की, श्रीकृष्णाच्या भूमिकेत शिरून पाठिंब्याच्या करंगळीवर सरकारला टेकू देतात. या मतलबी करंगळ्यांनीच कॉंग्रेसची सूज वाढवली व देशात घाण केली. ममता बॅनर्जी काय करतील याचा भरवसा तूर्त तरी कोणीच देऊ शकत नाही. मायावतीचे राजकारणही बेभरवशाचे. द्रमुकचे हात सीबीआयच्या दगडाखाली अडकलेत व शरद पवारांची ‘टेहळणी’ शेवटपर्यंत सुरूच असते. या सगळ्याचा लाभ शेवटी कॉंग्रेस उचलते व देश विकण्याचा सौदा तडीस नेते. या सौद्यात सामील झालेला प्रत्येक राजकीय पक्ष कॉंग्रेसपेक्षा जास्त अपराधी आहे.
गृहमंत्र्यांची पाठ!
नराधम कसाबला विशेष कोर्टाने, हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टानेही फाशीची शिक्षा ठोठावली. जनता न्यायालयाने तर त्याला खटला सुरू होण्याआधीच फाशी ठोठावली व गेटवे ऑफ इंडियासमोर जाहीररीत्या त्यास फाशी द्यावी अशी मागणी केली. पण आमच्या कायद्याच्या लफडेबाज देशात अशा नराधमांना ‘दया’ याचिका दाखल करून महिनोन्महिने जिवंत राहण्याची संधी मिळते. त्यामुळे आपल्या दयावान, मानवतावादी देशाच्या राष्ट्रपतींकडे कसाबने दया अर्ज केला आहे. आता मुंबईच्या ऑर्थर रोड जेलातून नराधमाने दयेचा अर्ज केलाच आहे ना? मग ठीक आहे. कायद्याचे हे एक लफडेसुद्धा मार्गी लागले. फक्त हे लफडे फार न वाढवता पुढच्या चोवीस तासांत निर्णय घेऊन मोकळे व्हा. एव्हाना हा दया अर्ज गृहमंत्र्यांकडे पोहोचला असेल. त्यामुळे गृहमंत्री शिंदेंनी या अर्जावरील आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण करून स्वत:च हा अर्ज घेऊन राष्ट्रपती भवनात हाजीर व्हावे व दया अर्ज निकाली काढून कसाबच्या फाशीचा मार्ग मोकळा करावा. गृहमंत्रालयाच्या शिफारसीवर राष्ट्रपती निर्णय घेत असतात व गृहमंत्री पदाची खुर्ची मिळताच हेच शिंदे हसत हसत म्हणाले होते, ‘कसाबच्या बाबतीत असा निर्णय घेईन की, सारा देश माझी पाठ थोपटल्याशिवाय राहणार नाही!’ ती संधी शिंदेंना मिळाली आहे. निर्णय असा घ्या की, पाठीवर शाबासकीची थाप पडेल. संतप्त आसुडांचे फटके पडणार नाहीत याची काळजी घ्या. तूर्त तरी इतकेच!
No comments:
Post a Comment