Saturday, December 29, 2012

मेणबत्त्यांची गर्जना..!


मेणबत्त्यांची गर्जना!राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे खासदारपुत्र अभिजित मुखर्जी वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. सध्या हिंदुस्थानचे राजकारण दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या भोवती फिरते आहे व त्यामुळे संपूर्ण देशात वावटळ उठल्यासारखे झाले आहे. दिल्लीतील एका मुलीवर बलात्कार झाला. याचा नुसता धिक्कार करून चालणार नाही. ‘फाशी द्या, फाशी द्या,’ अशा तात्पुरत्या आरोळ्या ठोकूनही चालणार नाही तर अशा गुन्हेगारांना खरं तर ठेचूनच मारले पाहिजे. निदान या एका बाबतीत तरी आम्ही इस्लामी कायद्याशी सहमत आहोत. दिल्लीतील बलात्काराच्या निमित्ताने रस्त्यावर लोकांनी उतरून संतापाचे प्रदर्शन केले, मेणबत्त्या पेटवून आंदोलन केले. त्यानंतर केजरीवाल, रामदेव बाबा व इतर पांढरपेशा स्वयंसेवी संस्थांनी या आंदोलनात उडी मारण्याचा प्रयत्न केला. हा सर्वच प्रकार नक्की काय आहे ते तुमच्या लोकशाहीत नव्याने सांगायला नको; पण राष्ट्रपतीपुत्राने या सगळ्यावर भाष्य करून अकारण वादळ ओढवून घेतले. ‘‘सामूहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीतील ज्या महिला आंदोलन करीत आहेत त्या रात्री डिस्कोमध्ये जातात आणि दिवसा इंडिया गेटवर आंदोलन करतात. शिवाय मेकअप करून चॅनलला मुलाखती देत असतात...’’ अशा प्रकारचे एक स्फोटक वक्तव्य करून मुखर्जी यांनी वादास निमंत्रण दिले. सध्या आंदोलन करणे एक फॅशन झाल्याचा रसगुल्ला मुखर्जी यांनी फोडला आहे. मुखर्जी म्हणतात, ‘हल्ली कोणीही उठतो आणि मेणबत्त्या पेटवून रस्त्यावर उतरतो. आता ही फॅशनच झाली आहे,’ असे एक विधान करून मुखर्जी यांनी मेणबत्तीछाप आंदोलकांना डिवचले आहे. या मेणबत्तीवाल्यांचे ‘मीडिआ’त लागेबांधे असल्याने त्यांनी मुखर्जी यांना ते फक्त राष्ट्रपतीपुत्र आहेत म्हणून चारही बाजूंनी घेरले हे सत्य स्वीकारावेच लागेल. खरे म्हणजे मेणबत्तीवाल्यांच्या संदर्भात अभिजित मुखर्जी यांनी जे सत्य सांगितले ती लोकभावना आहे. मुखर्जी यांनी या 
लोकभावनेस तोंड फोडले, पण चुकीची वेळ त्यासाठी निवडली. अभिजित मुखर्जी हे राष्ट्रपतींचे पुत्र नसते तर त्यांच्या ‘मेणबत्ती वक्तव्या’ची दखलही कुणी घेतली नसती, पण आज दिल्लीचे राजकारण व वातावरण त्या अबलेवरील बलात्कारामुळे तापले आहे. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था या विषयावर पेटून उठल्या आहेत. अर्थात, दिल्लीच्या राजपथावर उतरून ज्या महिलांनी आंदोलन केले किंवा मेणबत्त्या पेटवून निषेध केला त्यांच्या मनातील अंगाराचा क्षोभही आता थंड पडला आहे. त्या पीडित मुलीस सरकारने घाईघाईने सिंगापुरास नेण्याचे कर्तव्य बजावून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेल्या ‘मेणबत्त्या’ व देशातील संतप्त जनता यात जमीन-अस्मानचा फरक आहे, हे आधी लक्षात घ्यायला हवे. त्या दुर्दैवी मुलीच्या बाबतीत जे घडले ते देशाला काळिमा फासणारेच आहे. हे जे काही घडले आहे त्यामुळे वास्तविक संपूर्ण देशात क्रांतीची मशाल पेटायला हवी; पण त्याऐवजी तात्पुरत्या मेणबत्त्या पेटवल्या जातात. मेणबत्ती वितळून विझली की आंदोलनही वितळून विझून जाते व हे सत्यच आहे. आम्ही मुखर्जी यांच्या वक्तव्याचे ढोल पिटून त्यांचे समर्थन करणार नाही, पण दिल्लीतील बलात्काराच्या प्रकरणी ज्या मेणबत्त्या राजपथावर उतरल्या त्या इतर बलात्काराच्या वेळी नक्की कुठे असतात? दिल्लीतील त्या दुर्घटनेनंतर त्याच शहरात व आसपास अशाच दहा-बारा घटना घडल्या. खुद्द मुंबई-महाराष्ट्रात बलात्कार, अतिप्रसंग, विनयभंगाच्या डझनभर घटना घडल्या. बुधवारी नवी मुंबईतील मतिमंद मुलीस काही नराधमांनी वासनेचे शिकार बनवले व त्याच्या ‘बोटभर’ लांबीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांची दखल घेऊन किती ‘मेणबत्त्या’ आरोळ्या ठोकीत रस्त्यावर उतरल्या? हा सवाल जनतेच्या मनात येऊ शकतो आणि जनतेच्या मनात 
या ‘सत्या’ची मेणबत्ती पेटली म्हणून तुम्ही सर्व लोक जनतेलाच दोषी ठरवणार आहात का? ‘२६/११’ला मुंबईवर हल्ला झाला. ताज हॉटेल, कामा इस्पितळ, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पाकड्या अतिरेक्यांनी हल्ला करून रक्ताचे सडे पाडले; पण मेणबत्तीछाप आंदोलन झाले ते ताज हॉटेलसमोर. लिपस्टिक आणि पावडरच्या संतापाचा बॉम्ब फुटला तो ‘ताज’ परिसरात. त्याआधी मुंबईच्या बस स्टॉपवर, लोकल ट्रेनमध्ये पाकड्यांनी बॉम्बस्फोट घडवले होते. त्यात गोरगरीब मेले होते, पण मेणबत्त्या तेव्हा पेटल्या नाहीत. ‘ताज’ हॉटेलवर हल्ला होताच ‘पेज थ्री’ पार्टीवाल्यांनी धसका घेतला व हाती मेणबत्त्या घेऊन त्यांनी आंदोलन केले ही वस्तुस्थिती आहेच व त्यावर त्यावेळी अनेकांनी टीका केली होती. मुंबई-ठाण्यात बलात्कार, महिला, वृद्धांवर अत्याचार आजही सुरू आहेत; पण मेणबत्तीवाल्यांना त्याच्याशी काही घेणेदेणे नाही. मध्यंतरी केजरीवाल, हजारे यांच्या आंदोलनाच्या वेळीही अशा मेणबत्तीवाल्यांनी उचल खाल्ली होती. अजित पवारांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करणार्‍या विजय पांढरे यांच्या गावातही ‘मेणबत्ती’ मोर्चा काढून पांढरे यांचा जयजयकार झाला होता. अभिजित मुखर्जी यांनी त्याच मेणबत्ती संस्कृतीवर बोट ठेवून सत्य सांगितले. ते त्यांच्या अंगलट आले व शेवटी त्यांना माफी मागावी लागली. मग आमचा सवाल आता असा आहे की, पालघरमधील त्या ‘फेसबुकछाप’ मुलीच्या बाबतीत हेच मेणबत्तीवाले अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मेणबत्ती पेटवून तिच्या बाजूने उभे राहिले होते. त्या मुलीस सत्य बोलण्याचा अधिकार असल्याचे तेव्हा लिपस्टिक, पावडरवाले बोंबलत होते. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मेकअप अभिजित मुखर्जी यांच्याबाबतीत का उतरला? कुणी हे सत्यही मेणबत्तीच्या प्रकाशात सांगेल काय?

No comments:

Post a Comment