Sunday, December 30, 2012

‘वधस्तंभ’ उभारले पाहिजेत.......


‘स्मारके’ नकोत; ‘दामिनी’च्या नावाने वधस्तंभ उभारा!आमचा देश श्रद्धांजल्या वाहण्यात पटाईत आहे व श्रद्धांजल्या वाहणे हा आपला एक राष्ट्रीय कार्यक्रमच बनला आहे. त्या राष्ट्रीय कार्यक्रमास जागून मावळत्या वर्षाच्या अंधारात ‘बलात्कारित’ मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणती मुलगी? तिचे नाव काय? गाव काय? तिचे अस्तित्व काय? तिचा चेहरा काय? हे माहीत नसतानाही तिच्यावरील अत्याचाराविरुद्ध देश पेटून उठला. देश एकवटला. तिच्या मरणाने देश जागा झाला, पण जागा झालेला आपला देश पटकन विझतो. उठलेला समाज मटकन खाली बसतो. मेणबत्त्यांच्या गर्जना टी.व्ही. कॅमेर्‍यांचा झोत हटताच चटकन वितळून जातात हाच आमच्या समाजाचा दोष आहे. ती दामिनी आहे, ती निर्भय आहे, ती लढणार्‍यांची प्रेरणा आहे, ती अग्निशिखा आहे, ती देशाची बेटी आहे अशा असंख्य पदव्यांनी तिला सन्मानित केले. उद्या तिच्या नावाने शौर्य पुरस्कार दिले जातील. तिच्या पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन केले जाईल. पैशांची घसघशीत मदत केली जाईल. तिच्यावर बलात्कार करणार्‍यांना पुढच्या दोन-चार महिन्यांत फासावर लटकवून सरकार स्वत:लाच ‘शूर’ मानून पाठ थोपटून घेईल, पण त्यामुळे काय होणार? दिल्लीच्या जंतर मंतरवर, राजपथावर त्या अज्ञात मुलीसाठी मेणबत्त्या पेटविणार्‍या 
समाजाने स्वत:मधील नराधमास आधी गाडले पाहिजे. हा देश स्वत:च्या मुलीसाठी-सुनांसाठी कधीच सुरक्षित राहणार नसेल तर त्या अज्ञात ‘दामिनी’साठी केला जाणारा शोक म्हणजे एक ढोंग ठरेल व राज्यकर्त्यांनीही ‘टी.व्ही.’च्या झोतात नक्राश्रूंनी रुमाल भिजवू नयेत. ‘दामिनी’च्या विझलेल्या चितेनंतर लोकक्षोभाची चिताही वितळलेल्या मेणबत्त्यांप्रमाणे शांत होणार असेल तर या देशातील ‘लेकी-सुना’ रोजच अत्याचाराच्या बळी ठरतील. त्या ‘दामिनी’वर पाशवी बलात्कार करणारे कुणी दुसर्‍या धर्माचे नराधम असते तर एव्हाना दंगली पेटल्या असत्या. अशा नराधमांना जात व धर्म नसतो, पण आमच्या देशात राजकारण कशाचेही होते. कधीही होते. हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात स्त्रीची सुरक्षितता आणि स्त्रीची अब्रू अत्यंत पवित्र मानण्यात येते. त्यास जरासाही धक्का लागला तरी समाजाचे प्राण कासावीस होऊन संताप अनावर झाल्याशिवाय राहात नाही. तसे झाले नाही तर आमचा समाज नामर्द व षंढ बनला आहे असे मानायला हरकत नाही. अर्थात, एका महिलेवरील अत्याचारी बलात्काराची खंत न वाटण्याइतका आमचा समाज नामर्द नक्कीच नाही हे ‘दामिनी’ प्रकरणाने दाखवून दिले. मात्र त्या घटनेविरुद्ध पांढरपेशा समाज मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरला व मेणबत्त्या पेटवून अंतर्धान पावला, असे होऊ नये. दुर्दैवाने यापूर्वी असे घडले आहे. हाच देशाच्या चिंतेचा विषय आहे. राष्ट्रपतीपुत्र अभिजित मुखर्जी यांनी त्याच कटू सत्यावर बोट ठेवले. ‘दामिनी’ किंवा ‘निर्भया’च्या बाबतीत जे घडले ते मनाच्या चिंधड्या उडविणारे आहे. या गुन्ह्यास दयामाया नाही. 
वाटल्यास आधी फाशी मग चौकशी हा न्याय लावला तरी हरकत नाही अशी लोकभावना आहे. स्त्री मग ती कोणत्याही धर्माची, जातीची, पंथाची किंवा समाजाच्या गरीब-श्रीमंत थरातील असो, कोणतीही ‘अबला’ सुरक्षित असायलाच हवी. या समाजातील वेश्यावस्त्यांतही बलात्कार होता कामा नये. स्त्रीची विटंबना तर राहोच, पण तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची व तिच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत नराधम व्यक्तीलाही होणार नाही एवढा धाक कायदा आणि तो राबविणार्‍या शासन नावाच्या यंत्रणेचा असायला हवा. दुर्दैवाने आपल्या देशात तशी परिस्थिती नाही. त्यामुळेच ती अज्ञात ‘दामिनी’ अमानुष अत्याचाराला बळी पडली व तिने मरण पत्करले. मात्र या घटनेची आठवण चार दिवसांपुरती न राहता समाजाने कायम ठेवली पाहिजे. त्यासाठी त्या ‘दामिनी’च्या नावाने स्मारके नकोत, तर तिच्या नावाने ‘वधस्तंभ’ उभारले पाहिजेत व महिलांवर अत्याचार करणार्‍या प्रत्येक नराधमास त्या वधस्तंभावरच फासावर लटकवायला हवे. स्मारके खूप झाली. आरक्षणाच्या योजना भरपूर झाल्या. वितळलेल्या मेणबत्त्यांचाही खच पडला आहे. बस्स, दामिनीच्या विझलेल्या चितेस साक्ष ठेवून समाजाने शपथबद्ध व्हावे. आता स्मारके नव्हे तर त्या अज्ञात दामिनीच्या नावाने फक्त वधस्तंभच उभारू असा निर्धार समाजाने करायला हवा!

No comments:

Post a Comment