सुशीलकुमार शिंदे हे देशाचे गृहमंत्री आहेत की गांधी परिवाराचे ‘किचन मंत्री’, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. शिंदे यांची वक्तव्ये कधी कधी इतकी बालिश तर कधी कधी इतकी बेताल असतात की या महाशयांना हिंदुस्थानचे गृहमंत्री केले कोणी, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मूर्खपणाची विधाने करून स्वत:चे हसे करून घेण्यात सध्या कॉंग्रेसचे दिग्विजय सिंग व आपल्या सुशीलकुमार शिंदे यांच्यात जणू स्पर्धाच लागली आहे आणि महाराष्ट्राच्या शिंद्यांनी दिग्विजय सिंगांना आता मागे टाकले. यावर आनंद व्यक्त करावा की कपाळ बडवून घ्यावे? गृहमंत्री शिंदे यांनी जयपूरच्या चिंतन शिबिरात नवा वाचाळ बॉम्ब उडवून कॉंग्रेसची पंचाईत केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपसारखे जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत त्यांच्या शिबिरांत म्हणे दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजे शिंदे यांना असे म्हणायचे आहे की, हिंदुस्थानातील सध्याचा जो हिरवा धर्मांध दहशतवाद फोफावला आहे त्यास पाकिस्तान जबाबदार नसून हिंदुस्थानातील प्रखर राष्ट्रवादी संघटना व राजकीय पक्ष जबाबदार आहेत. कालपरवा हिंदुस्थानच्या सीमेवर पाकडे अतिरेकी म्हणा किंवा सैनिकांनी घुसून कसाई पद्धतीने आमच्या जवानांची निर्घृण हत्या केली. एका जवानाचे शिर कापून नेले. त्या दहशतवादामागेही पाकिस्तान वगैरे नसून हिंदुत्ववादी संघटना आहेत. हा जो कोणी अफझल गुरू नामक धर्मात्मा तिहार तुरुंगात पोसला जातोय व त्यास फाशीची शिक्षा ठोठावली असूनही जगवला जातोय तोसुद्धा पाकिस्तानी नसून हिंदुत्ववादी संघटनांचाच म्होरक्या आहे व चांदणी चौकातील संघाच्या शाखेत तो हाफ चड्डीत दंडुका फिरवीत कवायती करताना शिंद्यांनी स्वत: पाहिले आहे. हिंदुस्थानातील
दहशतवादाचे खापर हिंदू समाजावरच फोडायचे म्हटल्यावर शिंदे यांच्या तुळतुळीत डोक्यातून दुसरे कोणते विचार निघू शकतात? शिंदे यांनी त्यांची सारासार विवेकबुद्धी नक्की कोठे बुडवली आहे ते माहीत नाही, पण त्यांच्या नव्या वक्तव्याने पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना आनंदाचे भरते आले असेल आणि त्यांनी ‘व्वा, शिंदेमियां व्वा!’ असे म्हटले असेल एवढे नक्की. नेहमीप्रमाणे शिंदे यांनी देशातील दहशतवादाबद्दल हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरताच अशीच बेताल बडबड करणारे त्यांचे कॉंग्रेजी सहकारी मणिशंकर अय्यर आणि दिग्विजय सिंग यांनीही टाळ्या वाजविणे अपेक्षितच होते. साहजिकच त्यांनीही शिंदे महाशयांच्या सुरात सूर मिसळला. इतर कॉंगे्रसवाले अद्यापि मौनात असले तरी कॉंगे्रसचा पूर्वेतिहास यासंदर्भात वेगळा नाही. पुन्हा शिंदे यांचे हे वक्तव्य व्यक्तिगत आहे असेही त्यांचा पक्ष म्हणू शकत नाही. कारण त्या पक्षाच्या चिंतन शिबिराच्या व्यासपीठावरूनच त्यांनी हे तारे तोडले आहेत. बरं, त्यांचे मत व्यक्तिगत कसे असू शकते? देशाच्या गृहमंत्रीपदाची झूल त्यांच्या अंगावर आहे म्हणूनच त्यांच्या मतास प्रसिद्धी मिळते. शिंदे हे कोणी रस्त्यावरचे सोमेगोमे असते तर त्यांनी कमरेवरचे सोडून डोक्यास गुंडाळले असते तरी त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नसते. मागचे झालेगेले विसरून पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याचा सल्ला देणारे हेच शिंदे आहेत व पाकने आमच्या जवानांची डोकी उडवली तरी पाकशी मैत्रीपूर्ण चर्चा सुरूच राहील, असा दुर्दम्य आशावाद बाळगणारेही हेच शिंदे आहेत. शिंदे यांचा हा आजार जुनाच आहे व अधूनमधून तो बळावत असतो; पण शिंदे यांच्या अशा बेताल वक्तव्याने पाकिस्तानला बळ मिळते व त्यांच्याबरोबरची आपली लढाई पचपचीत होते. पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान व हिंदुस्थानचे गृहमंत्री शिंदे यांची भाषा जणू एकच. म्हणजे रहेमान यांची व्हिस्की व शिंदे यांचा बर्फ यांचा मस्त मिलाफ झाला. रहेमान हिंदुस्थानात येऊन तरी काय बकला होता? तोही असाच बडबडला होता की, ‘‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास पाकिस्तान जबाबदार नसून हिंदुस्थान जबाबदार आहे. बाबरी पाडली नसती तर ‘२६/११’चा हल्ला झालाच नसता!’’ शिंदे यांनी तरी वेगळे काय सांगितले? ‘२६/११’च्या हल्ल्यात
पाकिस्तानचा हात असल्याचा ढळढळीत पुरावा आमच्या शहीद तुकाराम ओंबळेने समोर आणला असतानाही दिग्विजय सिंगसारखे कॉंग्रेसवाले हेमंत करकरेंच्या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनाच असल्याचे बोलून पाकिस्तानला मदत करीत राहिले. दिग्विजय सिंगांचीच री आता शिंदे ओढीत आहेत. ‘ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ असेच म्हणावे लागेल. शिंदे यांच्या वक्तव्याने कॉंग्रेसचे डोके किती कामातून गेले आहे व मुसलमानी मतांच्या लाचारीपोटी त्यांनी आपल्या मनाचा कसा उकिरडा केला आहे ते दिसून येते. सुशीलकुमार शिंदे यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करून स्वत:चे नाव व स्थानही खड्ड्यात घातले असून महाराष्ट्रालाही त्यांच्याविषयी ममत्व वाटेनासे झाले आहे. गृहमंत्रीपद हे त्यांना अपघाताने मिळाले व बहुधा अशाच एखाद्या अपघाताने हे पद त्यांना गमवावेदेखील लागेल. कपडेबाजीमुळे महाराष्ट्राच्याच शिवराज पाटलांवर गृहमंत्रीपद गमावण्याची वेळ आलीच होती व वाचाळपणामुळे शिंदे यांच्यावरही तीच आफत येईल, असे आमचे मन आम्हास सांगते. मेहनत नसली व विचारांची बैठक नसली की काय घडू शकते ते शिंदे यांच्या प्रकरणात दिसते. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना शिंदे यांच्या बेताल वक्तव्यामुळे खूश झाल्या असतील. त्या हाफीज सईदने तर सीमेवर जाऊन आनंदाने थयथयाट केला असेल. कारण प्रत्यक्ष हिंदुस्थानच्या गृहमंत्र्यांनीच त्यांना क्लीन चिट दिली आहे. बहुधा दाऊद इब्राहिमनेही कराचीतून त्याची बॅग भरून मुंबईकडे प्रयाण केले असेल. तोही मुंबईत उतरून पोलिसांना खडसावेल, ‘‘कोण म्हणतोय मी दहशतवादी? विचारा तुमच्या केंद्रातील गृहमंत्र्यांना. मुंबई, दिल्ली, कश्मीरातील दहशतवादामागे ‘भगवे’ डोके आहे हो!’’ शिंदे, तुमच्यासारखे तुम्हीच. यापुढे पाकिस्तानचे अतिरेकी ‘अल्ला हो अकबर’ऐवजी ‘हर हर महादेव’च्या गर्जना करीत हिंदुस्थानात घुसतील. कारण शिंदे मियॉंनी ‘अल्ला हो अकबर’ची बांग दिली आहे.
No comments:
Post a Comment