Friday, September 21, 2012

। हाच तो क्षण, हीच ती वेळ।

स्वप्ना पाटकर
। हाच तो क्षण, हीच ती वेळ।
वेळेचे महत्त्व आपल्याला नेहमीच सांगितले जाते. वेळ वाया न घालवण्यावर अनेक लोकांची व्याख्यानेही ऐकली असतील. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. एका क्षणात सर्व काही बदलू शकते. एका सोडलेल्या कॅचमुळे जिंकत असलेल्या मॅच हरल्या जातात. एका क्षणाच्या असावधपणाने अपघात होतात. एक क्षण फार मोलाचा असतो. यालाच टायमिंग असे आपण म्हणतो. विनोद ऐकल्यावर अर्ध्या तासाने हसून प्रतिक्रिया देणार्‍याला वेडा म्हणतात. तसेच वेळ चुकवणार्‍यांना दुर्दैवीही म्हटले जाते. एक लहान पोरगा असीम, एक बॉम्ब हातात धरून उभा होता. कट्टर संगतीत मनाचा दगड झाल्यासारखे त्याला वाटत होते. जिहादच्या नावाखाली जसे अनेक बर्बाद झाले त्यातलाच होता हा असीम. हुकूम मिळाला, खूप सारे जीव घ्यायची कामगिरी त्याच्या हाती सोपवली गेलेली. महाराष्ट्रात, मराठी भाषा घरी बोलणारा असीम मुसलमान असून मराठी होता. जिहादचे ओझे आणि साधे कुटुंब यात त्याची कोंडी झालेली. त्या क्षणी तो सर्व काही विसरून ‘फिदाईन’ या भूमिकेत उभा होता. हो तोच हा क्षण. त्याला आई आठवली, वडील आठवले, शेजारच्या मराठी काकू आठवल्या, शाळेतले गुरुजी आठवले, त्या स्टेशनवर जिथे तो थैमान माजवणार होता, रक्ताची होळी खेळणार होता. तिथे काहीच नाही झाले, नेहमीसारखे सर्व सुरळीत चालले. याचे कारण ‘तो एक क्षण’ असीम घरी परतला. साधारण आयुष्य जगू लागला. असीमने नंतर मित्रांना सांगितले, ‘मी तो बॉम्ब हातात घेऊन उभा होतो. तो क्षण परीक्षेचा होता. मी स्वत:ला विचारले, मी काय करत आहे? मला त्या क्षणाने वाचवले. मी ठरवले खरा जिहाद म्हणजे माणसांना मारणे नसून माणुसकीला घातक ठरणार्‍या गुणांना मारणे. आज मी उर्दू शाळेत शिकवतो. धर्माचा खरा अर्थ काय तो मला त्या एका क्षणात कळला.’
हाच तो क्षण आपल्याही आयुष्यात येतो. आपण हे क्षण घालवतो. तसे करू नका. प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजा. आयुष्याचे टायमिंग चुकले की सर्व गणित चुकते. तो क्षण कोणता ते ओळखा. त्या क्षणात सर्व काही मिळते किंवा सर्व काही जाऊ शकते लक्षात ठेवा.
‘हाच तो क्षण, हीच ती वेळ

No comments:

Post a Comment