Sunday, September 23, 2012

मला अंत्ययात्रा पहायला आवडतात...!!

‘‘मला अंत्ययात्रा पहायला आवडतात!’’ हे वाक्य वाचून निश्‍चितच तुम्हाला धक्का बसला असेल, पण खरंच... मला अंत्ययात्रा पाहायला आवडतात कारण त्या मला आयुष्यातील सर्वात मोठ्या सत्यापर्यंत पोहोचवतात. कुणी फकीर असो की दहा हजार कोटींचा मालक, शेवटी आपण सगळे तिथेच जाणार हे सत्य ज्याला कळले त्याला सर्व काही कळले हे म्हणायला हरकत नाही. मृत्यूपर्यंतच्या प्रवासालाच आयुष्य म्हणतात. कुणी अल्प वयात मरण अनुभवतात, तर कुणी वर्षानुवर्षे मरणाची वाट पाहत राहतात. कुणी स्वत:च मरणाला मिठी मारतात, तर काहींना त्यात ढकलले जाते. काही तर जिवंतपणी रोज मरत राहतात. एक नक्की आहे की, मरण कुणीही टाळू शकत नाही. टेन्शन, जबाबदार्‍या आणि स्वप्नांची ओझी वाहत जगणार्‍या आपल्या सर्वांना वाटते, ‘‘मी नसलो तर कसे होणार सर्वांचे!’’ पण जग कुणासाठी थांबत किंवा अडत नाही. आपण नसलो तरी ते तसेच नीट चालते. आपण कसे आहोत, काय आहोत हे आपल्याला माहीतच 
असते, पण इतरांचे मत काय ते मेल्यावरच समोर येते असे सरांना कुणीतरी सांगितले. सरांना वाटायचे त्यांच्या कडक स्वभावामुळे सर्वांचे ते नावडते असणार. ते कमी बोलत. शिस्त, स्वच्छता व टापटीप पोरांच्या आयुष्यात असावी म्हणून ते सतत त्यांना उपदेश देत. ते एकदा पत्नीला म्हणाले, ‘‘मी माझे जीवन विद्यार्थ्यांना शिकवण्यात व जगण्याचा चांगला मार्ग दाखवण्यात वेचले. कधी कधी मी ओरडलो, चिडलो; पण पोरांच्या भल्यासाठी. पैसा कमावला नाही. कोणता मोह ठेवला नाही, पण मला वाटते माझ्या या कार्याची कुणाला जाण नाही. मुले थट्टा करतात, माझ्या शिस्तबद्ध उपदेशांचा राग करतात. काय मिळाले मला आयुष्यात. व्यर्थ आहे माझे जगणे!’’ त्यांच्या पत्नीने त्यांना म्हटले, ‘‘तसे काही नाही आणि मी तुमचा गैरसमज दूर करते.’’ तिने घराचे दरवाजे लावले. सरांना घरातच राहा असे सांगितले व घराबाहेर येऊन एका विद्यार्थ्याला रडत म्हणाली, ‘‘सर आपल्याला सोडून गेले रे!’’ तो मुलगा वेड्यासारखा धावत सुटला. त्याने फक्त शाळेलाच नाही तर गावभर बातमी पसरवली. संपूर्ण गाव सरांच्या घराबाहेर जमले. काही जुने विद्यार्थी गावाबाहेर होते तेही निघाले होते तिथून. दुरून दुरून सर्व जमू लागले. सर्वांचे भरलेले डोळे आणि हावभाव पाहून सरांची पत्नीही भावूक झाली. घराचे दार उघडून तिने सरांना बाहेर बोलावले. गर्दी पाहून सर भारावले. त्यांची पत्नी म्हणाली, ‘‘तुम्ही काय कमावले ते आज तुमच्यासमोर आहे. पैसा कमावणे सोपे असते, पण तुम्ही हे जे प्रेम कमावले आहे ते सर्वांच्या वाट्याला येत नाही.’’ सरांना त्यांच्या श्रीमंतीची जाणीव झाली.
आपण मेल्यावर आपल्या बँक बॅलेन्सचे काही महत्त्व नाही, महत्त्व असते ते आपण जमवलेल्या-जोडलेल्या नात्यांचे. तुमच्या आयुष्याचा पिक्चर हिट असावा. शेवटी खूप टाळ्यांच्या कडकडाटात तुमचा समारोप व्हावा. तुमच्या शेवटीचा शो हाऊसफुल्ल असावा.श्रीमंती अशी असावी. सर्वांच्या व माझ्या आयुष्याचा शेवटचा शो असाच हाऊसफुल्ल असावा ही देवाकडे प्रार्थना.!

No comments:

Post a Comment